Ad will apear here
Next
यंदाचा ऑस्करविजेता चित्रपट - ग्रीन बुक


२०१९चा ऑस्कर पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. ग्रीन बुक हा चित्रपट त्यात सर्वोत्कृष्ट ठरला. या चित्रपटाला एकूण तीन ऑस्कर पुरस्कार मिळाले. या चित्रपटाबद्दल लिहीत आहेत ज्येष्ठ लेखक रवींद्र गुर्जर... त्यांच्या ‘किमया’ या सदरात... 
..........
वर्ण आणि वंशद्वेषावर आधारित अनेक इंग्रजी चित्रपट आजवर प्रदर्शित झाले आहेत. कित्येक कृष्णवर्णीय नट हॉलिवूडपटांमध्ये विलक्षण लोकप्रिय ठरलेले आहेत. सिडने पॉइशर, जिम ब्राऊन, मॉर्गन फ्रीमन, डेंझल वॉशिंग्टन, विल स्मिथ, एडी मर्फी, लॉरेन्स फिशबर्न, सॅम्युएल जॅकसन हे पुरुष कलाकार आणि व्हूपी गोल्डबर्ग, हॅले बेरी, रुबी डी, जेनिफर हडसन इत्यादी स्त्री कलाकारांनी असंख्य भूमिका गाजवल्या आहेत.

सिडने पॉइशरचे ‘गेस हू इज कमिंग टू डिनर’ आणि ‘इन दी हीट ऑफ दी नाइट’ हे दोन चित्रपट खूप गाजले. ‘डिनर’ची कथा अशी : शिक्षणासाठी बाहेरगावी असलेली एक गोरी मुलगी आपल्या आईला ‘मी लग्न ठरवलं आहे आणि त्या मुलाला घेऊन मी भेटायला येत आहे,’ असा फोन करते. साहजिकच आईला आनंद होतो. मुलगी ‘मुला’सह हजर होते. त्या कृष्णवर्णीय मुलाला पाहून आईला धक्काच बसतो. (हा चित्रपट १९६७ सालचा आहे.) त्यानंतर घरात घडलेल्या संघर्षाचे ते हास्य-नाट्य आहे. स्पेन्सर ट्रेसी, कॅथरीन हेपबर्न आणि सिडने यांचा अभिनय अप्रतिम. ‘इन दी हीट ऑफ दी नाइट’मध्ये सुरुवातीला एक खून होतो. पोलिसांचा सर्वत्र तपास सुरू होतो. रेल्वे स्टेशनवर एक ‘काळा’ माणूस (सिडने) गाडीची वाट बघत बसलेला आहे. संशयावरून त्याला पकडण्यात येते. पोलीस स्टेशनमध्ये त्याची तपासणी केली असता, तो अमेरिकेतल्या दुसऱ्या एका प्रांतामधला पोलीस अधिकारी निघतो. पुढे खुन्याला शोधून काढण्यात त्याचाच उपयोग होतो आणि स्थानिक गोरा पोलिस अधिकारी त्याला स्वत: विमानतळावर शेवटी सोडायला जातो.

त्याच प्रश्नावर आधारित असलेला ‘टू किल ए मॉकिंग बर्ड’ हा चित्रपट १९६२ साली प्रदर्शित झाला. त्यात एक ‘गोरा’ वकील (ग्रेगरी पेक) गोऱ्या बाईवर बलात्काराचा खोटा आरोप असलेल्या कृष्णवर्णीयाला सोडवण्यासाठी झगडा देतो. असे अनेक उत्कृष्ट चित्रपट तयार झालेले आहेत. वर्णभेदाचा प्रश्न बराचसा सौम्य झाला असला तरी पूर्णपणे संपलेला नाही. (आपल्याकडे जातिव्यवस्थेची तीच स्थिती आहे.) १९९२ साली सिडने पॉइशरला जेव्हा ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात ‘लाइफटाइम अचीव्हमेंट अॅवॉर्ड’ जाहीर झाला, तेव्हा तिथे सभागृहात हजर असलेले सर्व कलावंत उभे राहून सतत पाच मिनिटे टाळ्या वाजवत होते. सिडनेबरोबरच जगभरातल्या कोट्यवधी प्रेक्षकांचे डोळे पाणावले. त्याला आता २७ वर्षे झाली, तरी अजूनही ते दृश्य डोळ्यांसमोर उभे आहे. एका ‘कृष्ण’ कलाकाराचा तो हृद्य असा सर्वोच्च सन्मान होता.

यंदा ९१वा ऑस्कर सोहळा गेल्या महिन्यात लॉस एंजेलिसमधील डॉल्बी थिएटरमध्ये दिमाखात साजरा झाला. हा कार्यक्रम नेहमीच दर्शनीय आणि श्रवणीय होतो. अमेरिकेत, संपूर्ण वर्षात प्रदर्शित झालेल्या चित्रपटांमधील निरनिराळ्या विभागांना (लेखन, दिग्दर्शन, संगीत, अभिनय, चित्रीकरण, इत्यादी इत्यादी) पुरस्कार जाहीर होतात. सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून या वेळी ‘ग्रीन बुक’ची निवड झाली आहे. त्याला एकूण तीन ‘ऑस्कर्स’ मिळाली. उत्कृष्ट सहायक अभिनेता म्हणून महेर्शाला अली आणि उत्कृष्ट मूळ पटकथा लेखनासाठी निक वॅलेलोंगा आणि पीटर फॅरेली यांना पुरस्कार मिळाले. ‘पार्टिसिपंट मीडिया’ आणि ‘ड्रीमवर्क्स’ कंपन्यांद्वारे या चित्रपटाची निर्मिती झाली. जिम बर्क, पीटर फॅरेलीसह सात निर्माते आणि दिग्दर्शक पीटर फॅरेली आहेत. मुख्य कलाकार विगो मॉर्टेनसन, महेर्शाला अली आणि लिंडा कार्डेलिनी. ‘ग्रीन बुक’ ही एक सत्यकथा आहे. दोन भिन्नवर्णीय व्यक्ती काही काळासाठी एकत्र येतात. सुरुवातीला दोघांत ‘रंगा’मुळे अढी आणि अंतर आहे; परंतु हळूहळू त्याचे उत्तम मैत्रीत रूपांतर कसे होते, हे त्यात दाखवले आहे. प्रत्यक्षात ही नाट्यमय कथा घडल्यानंतर सुमारे पंचावन्न वर्षांनी त्यावरील चित्रपट प्रदर्शित झाला. त्यातील दोन मूळ प्रमुख व्यक्तिरेखा टोनी लिप (कलाकार : विगो मॉर्टेनसन) आणि डॉन शर्ली (कलाकार : महेर्शाला अली) यांचे २०१३मध्येच निधन झाले. कृष्णवर्णीय पियानोवादक डॉन शर्ली याच्या इच्छेनुसार त्याच्या मृत्यूनंतर चित्रपट निर्माण झाला. त्याच्या नातलगांनाही त्याबद्दल माहिती दिलेली नव्हती. त्यामुळे ते नाराज झाले होते. परंतु शर्लीची तशी अटही होती.



‘ग्रीन बुक’ भारतात दाखल झालेला आहे. पुरस्कारप्राप्त चित्रपट (चांगले असले तरी) फार चालत नाहीत. प्रेक्षकांपर्यंत ते पोहोचत नाहीत, असा इतिहास आहे. ‘यू-ट्यूब’ आणि ‘डाउनलोड’च्या सोयीमुळे आता परिस्थिती बदलली आहे. आपण चित्रपटाचे कथानक थोडक्यात पाहू.

न्यूयॉर्क शहरातला एक ‘बाउन्सर’ (कलदंड सुरक्षा सेवक) फ्रँक ‘टोनी लिप’ वॅलेलोंगा नव्या नोकरीच्या शोधात आहे. तो काम करत असलेला एक नाइट क्लब नूतनीकरणासाठी बंद झालेला आहे. आफ्रो-अमेरिकन पियानोवादक डॉन शर्ली त्याला मुलाखतीसाठी बोलावतो. त्या कलाकाराचा आठ आठवडे मध्य-पश्चिम आणि दक्षिण अमेरिकेतील राज्यांमध्ये मैफलींसाठी दौरा ठरलेला असतो. त्यासाठी एका गाडीचालक अधिक सुरक्षारक्षकाची त्याला गरज असते. टोनी त्या दोन्ही कामांसाठी योग्य असल्यामुळे, शिवाय तशी शिफारसपत्रे असल्याने डॉन त्याची निवड करतो. दौरा आटोपून नाताळच्या संध्याकाळी न्यूयॉर्कला परतणे, असा कार्यक्रम ठरतो. आफ्रो-अमेरिकन प्रवाशांना वाटेतील मोटेल्स, उपाहारगृहे, पेट्रोल स्टेशन्स आदी माहिती पुरवणारे ‘ग्रीन बुक’ गाइड डॉनला मिळते. खास गोऱ्या लोकांसाठी असलेल्या जागांमध्ये कृष्णवर्णीयांना प्रवेश नसतो.

मध्य-पश्चिमेचे कार्यक्रम व्यवस्थित होतात आणि ते दक्षिणेकडे वळतात. सुरुवातीला दोघांच्यात खटके उडतात. ‘वागणूक सभ्य ठेव’ असे सांगितल्यामुळे टोनी अस्वस्थ होतो. त्याच्या सवयींमुळे डॉन त्रासून जातो. दिवस जसजसे पुढे जातात, तसा डॉनच्या पियानोवादन कौशल्यामुळे टोनीचा त्याच्याबद्दलचा आदर वाढत जातो. शिवाय कार्यक्रम संयोजक आणि प्रेक्षकसुद्धा डॉनला जी अवमानास्पद वागणूक देतात, त्याचाही टोनीला विलक्षण राग येतो. एका बारमध्ये काही गोरे लोक डॉनला ठार करायची धमकी देतात, तेव्हा टोनी त्याची सुटका करतो. राहिलेल्या दौऱ्यात तो सोबत असल्याशिवाय डॉनने बाहेर पडू नये, अशी सूचना टोनी देतो. सगळ्या प्रवासात, डॉन टोनीला त्याच्या बायकोला पत्रे लिहिण्यात मदत करतो. त्यामुळे ती खूपच भारावून जाते. टोनीसुद्धा डॉनला त्याच्या संबंध बिघडलेल्या भावाशी संपर्क साधावा, म्हणून प्रोत्साहन देतो. परंतु डॉन त्याचे व्यावसायिक जग आणि यशामुळे कुटुंबापासून दुरावलेला असतो. त्यामुळे त्याचा मानसिक गोंधळ झालेला असतो.

एका गोऱ्या माणसाशी समलैंगिक व्यवहार करताना डॉन सापडतो; पण टोनी लाच देऊन त्याची अटक रोखतो. पुढे एका रात्री उशिरा त्यांना एका पोलिस अधिकाऱ्याने हटकल्यामुळे टोनी त्याला ठोसा लगावतो आणि दोघांना अटक होते. डॉन आपल्या वकिलाला फोन करण्यासाठी विनंती करतो आणि अॅटर्नी जनरल रॉबर्ट एफ. केनेडी यांच्याशी संवाद साधतो. त्यांच्या मध्यस्थीमुळे दोघांची त्वरित सुटका होते. टोनीला त्या अनुभवाने आश्चर्य वाटते; पण डॉनची मानहानी होते. मग दोघांत जोरदार वादविवाद होतो आणि आपले मन डॉनपेक्षाही काळे आहे, असे टोनीला वाटू लागते. झालेल्या मनस्तापामुळे डॉन आपले दु:ख टोनीसमोर प्रकट करतो. प्राप्त झालेल्या वैभवामुळे त्याला आपल्या वंशाच्या लोकांशी संबंध ठेवणे आवडत नाही. उलट, त्याच्या भाईबंदांना गोऱ्या लोकांनी त्याला स्वीकारू नये, असे वाटत असते. त्याच्या समलैंगिकतेमुळे ‘काळे-गोरे’ दोन्हीही त्याला जवळ करत नाहीत. जगात तो एकाकी अवस्थेत वावरत असतो.

बर्मिंगहॅम (अलाबामा) येथे शेवटचा कार्यक्रम असतो, जिथे डॉनला वादन करायचे निमंत्रण असते. त्या गोऱ्यांच्या हॉटेलात त्यालाच प्रवेश मिळत नाही. टोनी मालकाला धमकी देतो; पण डॉन तिथे गायला नकार देतो. नंतर टोनी त्याला काळ्या लोकांच्या क्लबमध्ये घेऊन जातो. डॉन आपल्या उत्कृष्ट संगीताने श्रोत्यांना प्रचंड आनंद देतो. नंतर दोघे उत्तरेकडे परतीच्या प्रवासाला निघतात. हिमवादळ सुरू होते. थकलेल्या टोनीला विश्रांती देण्यासाठी डॉन स्वत: गाडी चालवतो. ठरल्याप्रमाणे नाताळच्या दिवशी ते घरी पोहोचतात. टोनी डॉनला भोजनाचे निमंत्रण देतो. तोही जातो. टोनीची पत्नी चांगली पत्रे लिहिण्यात मदत केल्यामुळे डॉनचे आभार मानते. चित्रपटाच्या अखेरीस वास्तवातल्या दोघांची छायाचित्रे आणि त्यांचे वर्णन दाखवले आहे. डॉन आपले दौरे आणि संगीत/ध्वनिमुद्रणाचे काम चालू ठेवतो आणि टोनी आपला पहिल्या कामावर रुजू होतो. दोघेही मरेपर्यंत चांगले मित्र राहतात. २०१३मध्ये काही महिन्यांच्या अंतराने दोघांचाही  मृत्यू होतो.

‘ग्रीन बुक’ची उत्कृष्ट चित्रपट म्हणून निवड झाल्यानंतर काही वाद आणि मतभेद झाले. तसे होतच राहते; परंतु परीक्षकांचा निर्णय अंतिम असतो. चित्रपटाचा जागतिक ‘प्रीमिअर’ ११ सप्टेंबर २०१८ रोजी टोरांटो आंतरराष्ट्रीय चित्रमहोत्सवात झाला. ‘ऑस्कर’खेरीज इतर अनेक पुरस्कार त्याला प्राप्त झाले आहेत. निर्मितीचा खर्च दोन कोटी ३० लाख, तर आजवरचे एकूण उत्पन्न अंदाजे १५ कोटी डॉलर्स झाले आहे. टोनीच्या भूमिकेसाठी विगो मॉर्टेन्सनने आपले वजन अंदाजे ५० पौंडांनी वाढवले. तसेच त्याच्या मुलाचा पटकथालेखनात सहभाग राहिला. १६ नोव्हेंबरला चित्रपट अमेरिकेतल्या फक्त २० शहरांत प्रदर्शित झाला. समीक्षकांनी चांगले अभिप्राय दिले. प्रेक्षकांकडून चित्राला ‘A+’ दर्जा मिळाला.

एक मान्यवर ‘काळा’ कलाकार आणि एक बाहुबली ‘गोरा’ सामान्य माणूस यांच्यातल्या अनोख्या मैत्रीची ही कथा आणि त्यावरचा चित्रपट २१व्या शतकातही ताजातवाना विषय ठरतो.

रवींद्र गुर्जर
संपर्क : ९८२३३ २३३७०
ई-मेल : rvgurjar@gmail.com

(‘बाइट्स ऑफ इंडिया’वर दर रविवारी प्रसिद्ध होणाऱ्या रवींद्र गुर्जर यांच्या ‘किमया’ या सदरातील सर्व लेख https://goo.gl/TiSWnh या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.)

(‘पीरियड – एंड ऑफ सेन्टेन्स’ या भारतातील कथेवर आधारित असलेल्या माहितीपटाला ऑस्कर पुरस्कार मिळाला. त्याबद्दल वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/LZUXBY
Similar Posts
१८ वर्षांच्या चिन्मयने लिहिलेले उत्तम नाटक - संगीत चंद्रप्रिया ‘संगीत चंद्रप्रिया’ हे नाटक नुकतेच रंगभूमीवर आले असून, ते चिन्मय किरण मोघे या अवघ्या १८ वर्षांच्या प्रतिभासंपन्न तरुणाने लिहिले आहे. सर्वार्थाने उत्तम अनुभव देणाऱ्या या नाटकाबद्दल लिहीत आहेत ज्येष्ठ लेखक रवींद्र गुर्जर... त्यांच्या ‘किमया’ या सदरात...
उडत्या तबकड्या (उत्तरार्ध) उडत्या तबकड्यांचे गूढ अद्याप उलगडलेले नाही, हे खरे असले, तरी त्यांच्या नोंदी मात्र बऱ्याच झाल्या आहेत. अनेक ठिकाणी अशा उडत्या तबकड्या दिसल्याचे अनुभव लोकांनी लिहून ठेवले आहेत. त्यावरून त्यांचा काही अभ्यास, वर्गीकरण करण्यात आले. ज्येष्ठ लेखक रवींद्र गुर्जर यांच्या ‘किमया’ सदरात आज उडत्या तबकड्यांच्या लेखाचा उत्तरार्ध
पुण्यातील जुनी चित्रपटगृहे नुसत्या आठवणींनी गतकाळात नेणाऱ्या पुण्यातील जुन्या चित्रपटगृहांबद्दल लिहीत आहेत ज्येष्ठ लेखक रवींद्र गुर्जर... त्यांच्या ‘किमया’ या सदरात...
काश्मीर शैवमत ऋग्वेदात रुद्रदेवतेचे स्तवन आहे. त्या काळापासून शंकराला उत्पत्ती आणि विनाश करणारा सर्वश्रेष्ठ देव मानण्याची परंपरा सुरू झाली, असे मानले जाते. त्यालाच शैवमत असे म्हणतात. भारतात शैवमताचे अनेक उपपंथ आहेत. काश्मीर शैवमत ही त्यातीलच एक प्रसिद्ध परंपरा आहे. ‘किमया’ सदरात ज्येष्ठ लेखक रवींद्र गुर्जर आज लिहीत आहेत काश्मीर शैवमताबद्दल

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language